Friday 15 June 2012


विज्ञान  आणि बुद्धिवाद - प्रकरण 3  

प्रस्तावना

विश्वाचे ज्ञान केवळ पाच ज्ञानेंद्रियांमार्फतच ( किंवा त्यांची शक्ती वाढवणाऱ्या वैज्ञानिक उपकरणांमार्फतच होऊ शकते असे बुद्धिवाद मानतो. विश्वाचे ज्ञान तर्काने होऊ शकते - विश्व बुद्धिगम्य आहे - या बुद्धिवाद्यांच्या श्रद्धेला आधुनिक भौतविज्ञानातील शोधांनीच त़डा गेला असून ही श्रद्धा भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने तरी निराधार असल्याचे दिसून आले आहे. हे मागील दोन प्रकरणात आपण पाहिले. प्रस्तूत तिसऱ्या प्रकरणात मानवाच्या पंचेंद्रियांमार्फतच विश्वाचे ज्ञान होऊ शकते ही बुद्धिवाद्यांची जी दुसरी श्रद्धा आहे , ती कितपत बरोबर आहे हे पाहावयाचे आहे.

 ऐतिहसिक दृष्ट्या अतींद्रियशक्ती हा विषय भुताटकी, अंगात येणे, जादू टोणा, चेटूक आदी गोष्टींशी निगडीत असल्यामुळे या विषयाकडे पहाण्याचा माणसांचा दृष्टिकोण कधीच निःपक्ष किंवा शास्त्रीय राहू शकलेला नाही. नेहमीच तो भावनात्मक राहिला आहे. त्यामुळे याविषयाच्या बाबतीत नेहमीच अगदी टोकाचे दृष्टिकोण आढळून येतात. 
   एकः याविषयी आंधळी श्रद्धा बाळगणे म्हणजे याविषयी पुराव्यांचा विचार न करता सर्व काही खरे असते असे मानणे. 
   दुसरेः याविषयी आंधळी अश्रद्धा बाळगणे म्हणजे याविषयी पुराव्याचा विचार न करता सर्व काही  खोटे असते, असे मानणे. याविषयी खरे खोटे निवडणारा शास्त्रीय दृष्टिकोण असू शकतो हे कळायला मनुष्याला नेहमी जड गेल्याचे दिसून येते. 
   याबाबतीत पुरुषाच्या स्त्रीकडे पाहण्याच्या ऐतिहासिक दृष्टिकोणाची तुलना करण्यासारखी आहे. इतिहासावरून दिसून येते की, पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोण कधीच निःपक्ष किंवा शास्त्रीय राहिलेला नाही नेहमीच तो भावनात्मक राहिलेला आहे. या ऐतिहासिक - पौराणिक दृष्टीतून पाहता असे दिसून येते की, पुरुषाने स्त्रीला एक तर देवता (किंव जगन्माता) मानलेली आहे, नाहीतर चेटकीण (भोगदासी) मानलेली आहे. तिला बरोबरीचा माणूस म्हणून मानणे त्याला नेहमीच जड गेल्याचे दिसून येते. समाजशास्त्राने स्त्रीचा शास्त्रीय दृष्टीकोणातून विचार करून तिला जसे पुरुषाबरोबरीचे समाजात स्थान दिले आहे तसे परामानसशास्त्राने अतींद्रिय विषयाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहून त्याला विज्ञानात इतर वैज्ञानिक विषयाबरोबरीचे मानाचे स्थान दिले आहे. त्यामुळे स्त्रीला भोगदासी (किंवा चेटकीण) मानणाऱ्या जुन्या पुरुषप्रधान समाजातील पुरुषांप्रमाणे किंवा तिला देवता मानणाऱ्या धर्ममार्तंडांप्रमाणे अतींद्रिय हे थोतांड मानणारे प्रस्थापित विज्ञानवादी व बुद्धिवादी आणि अतींद्रियातील सर्वच चमत्कार खरे मानणारे अंधश्रद्धाळू हे दोघेही अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे!  
 
 बुद्धिवाद विज्ञानाच्या प्रगतीतील एक अडथळा

मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने एक तर्क केला आहे की मध्ययुगातील अंधश्रद्धा व जादूटोणा याविरुद्ध विज्ञानाने मिळवलेला विजय अतींद्रिय शक्तिचे अस्तित्व मान्य केले तर वाया जाईल अशी शास्त्रज्ञांना भिती वाटते. व पुन्हा अंधश्रद्धेचा सुळसुळाट होईल हा तर्क कितपत योग्य आहे हे सांगता येत नाही. खरे कारण माझ्यामते भावनिक आहे. काही लोकांना आपल्या आवडत्या सिद्धांताविरुद्ध एखादी घटना घडते, हेच मान्य होत नाही. ती घडावी ही गोष्टच त्यांना आवडत नाही, आणि जी गोष्ट आवडत नाही ती घडतच नाही असे ते मानतात. मग तिच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा ती खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हे दोनच पर्याय त्यांच्या पुढे उरतात. ती खोटी आहे हे सिद्ध करणे कठीण असल्यामुळे याविषयी प्रयोग करणाऱ्यांच्या हेतू विषयीच मग शंका घेण्यात येते. अतींद्रिय शक्तींवरील प्रयोगाबाबत लबाडी(Fraud) चा आरोप वरचेवर का करण्यात येतो याचा यावरून उलगडा होईल.
काही शास्त्रज्ञ मात्र अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व अज्ञानातून किंवा निव्वळ आडमुठेपणातून नाकारतात, ही वस्तुस्थिती आहे. याविषयी आयसेंक हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, एखाद्या क्षेत्रात नैपुण्य(Specialization) संपादन केलेल्या शास्त्रज्ञाचे मत इतर त्याने नैपुण्य न संपादलेल्या विषयात प्रमाण म्हणून स्वीकारणे धोक्याचे असते. कारण त्यात त्याचे ज्ञान शून्य असल्यामुळे आपल्या नैपुण्यक्षेत्रातील पुर्वग्रह त्यात घुसडून तो त्या विषयी आडमुठेपणा (pigheadedness) स्वीकारतो."
बऱ्याच तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे अतींद्रिय विषयक धोरण असे आडमुठेच आहे आणि त्याचे हेच कारण आहे. आता कोणी म्हणेल की, अतींद्रिय शक्तिंचे अस्तित्व वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केल्यानंतर सुद्धा ते आडमुठेपणाने नाकारणारे शास्त्रज्ञ खरोखरीच कोणी आहेत काय?  ही पहा उदाहरणे –
वॅरन वीव्हर हा कम्युनिकेशन (दळणवळण) सिद्धांताचा संस्थापक शास्त्रज्ञ म्हणतो, ‘अतींद्रिय शक्ती मला बौद्धिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी आणि मनाला यातना देणारी वाटते आणि म्हणून जे. बी. ऱ्हाईन यांनी सादर केलेले तिच्या अस्तित्वाविषयाचे पुरावे मला नाकारता येत नसले तरी ते मी स्वीकारत नाही’.
हेब हा मानसशास्त्रज्ञ खुलेपणाने म्हणतो, ‘अतींद्रिय शक्तींचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या आणखी (further)पुराव्याची आपल्याला आता गरज नाही, कारण त्या शक्तीच्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. ती तर्काविरुद्ध व बुद्धिला न पटणारी आहे, आणि म्हणून ती आपल्याला मुळीच मान्य नाही’.
विल्यम जेम्स या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञापुढे एका आघाडीच्या जीवशास्त्रज्ञाने पुढील उद्गार काढल्याचे जेम्स याने आपल्या, ‘The Will to Believe’ या ग्रंथात म्हटले आहे. की हा जीवशास्त्रज्ञ म्हणतो, अतींद्रिय शक्ती खरी असली तरी शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ती दडपून टाकली पाहिजे. किंवा सर्वापासून ती लपवून ठेवला पाहिजे. कारण निसर्गाच्या एकवाक्यतेला (Uniformity of Nature) त्यामुळे बाधा येते व विज्ञानाचे कार्य चालणे अशक्य होते.'
    बुद्धिला पटत नाही म्हणून किंवा मनाला यातना होतात म्हणून एखादे सत्य झाकून ठेवून विज्ञानाचे कार्य करणाऱ्या या शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक दृष्टिकोणाविषयी काय बोलावे! नको असलेले वैज्ञानिक सत्य दडपून टाकू इच्छिणारे हे शास्त्रज्ञ मूल रडू लागले तर त्याला स्तनपान देण्याऐवजी त्याच्या तोंडात बोळा कोंबायला सांगतील अशा पद्धतीने  विज्ञानाचे कार्य करणे बुद्धिद्यांना आवडत असले तरी शास्त्रज्ञांनी तसे करणे ही विज्ञानवृत्तीशी प्रतारणा ठरेल. कारण बुद्धिला न पटणाऱ्या गोष्टी स्वीकारणे, हे विज्ञानाचे पहिले आद्यकर्तव्य असल्याचे विज्ञानाच्या जन्माचा इतिहासच सांगतो. 
याशिवाय इथे वाचा
·         विश्वाकडे पहायच्या वैज्ञानिक दृष्टीत क्रांती
·         भौतिक वादाला कायमची मूठमाती
·         अतिंद्रिया बद्दल अपप्रचार
·         अतिंद्रिय संशोधकांविषयी काही गैरसमज

Saturday 9 June 2012


विज्ञान आणि बुद्धिवाद  प्रकरण 2 

 विज्ञानातीलचमत्काराकडून चमत्काराच्या विज्ञानकडे

प्रकरणाचे शीर्षक वाचून कोणाला ही असे वाटण्याची शक्यता आहे की, विज्ञानातही चमत्कार आहेत  आणि चमत्काराचे ही विज्ञान आहे असे असेल तर ज्या विज्ञानात चमत्कर आहेत त्याला विज्ञान कसे म्हणावे व ज्या चमत्कारांचे विज्ञान आहे त्याला चमत्कार कसे म्हणावे असा साहजिकच प्रश्न उपस्थित होईल. कारण आपण विज्ञान व चमत्कार एकत्र नांदू शकत नाहीत, त्या परस्पर विरुद्ध संकल्पना आहेत असे समजतो. मग या शीर्षकाचा अर्थ काय?


विज्ञानावर विश्वास ठेवणारे लोक चमत्काराला नाकारतात. या उलट चमत्कारांवर विश्वास ठेवणारे लोक, विज्ञानाला चमत्कारांची उपपत्ती लावता येणे शक्य नाही असे समजतात. वस्तुतः चमत्कार नाकारणारे व चमत्कारावर विश्वास ठेवून चमत्काराच्या उपपत्तीची शक्यता नाकारणारे हे दोघे ही चमत्कारांचा अर्थ मर्यादित करतात. पण चमत्कारांविषयीची ही मर्यादित किंवा रुढ कल्पना कितपत बरोबर आहे? आधुनिक वैज्ञानिक संशोधनाने या रुढ कल्पनेलाच धक्का दिला आहे. त्यामुळे चमत्कारांवर विश्वास ठेवणाऱ्यांप्रमाणेच चमत्कार नाकारणारे लोक सुद्धा एक प्रकारे अंधश्रद्ध ठरले आहेत.
चमत्कार हा रूढ कल्पनांवर आधारित आहे असे म्हणता येईल ही जी कल्पना रूढ झाली आहे ती एरव्ही चमत्कारयुक्त असली तरी केवळ सवयीमुळे तिच्यातील चमत्कार नाहीसा झालेला असतो. उदा. ज्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा (पाण्यावर वा हवेतून चालल्यामुळे ) भंग झाला तर चमत्कार घडला असे म्हणता येईल असे जे वर म्हटले ती गुरुत्वाकर्षण शक्ती हाच मुळी एक मोठा चमत्कार आहे. हे तिच्या विषयी शास्त्रीय सिद्धांत मांडण्यापुर्वी शास्त्रज्ञांनी सुद्धा त्या शक्तीला चमत्काराच्या सदरात ढकलले होते हा इतिहास आहे.  न्यूटनच्या पुर्वी केप्लरने पृथ्वीवरील समुद्रातील भरती ओहोटी सुर्याच्या व चंद्राच्या आकर्षणशक्तीमुळे घडून येतात, असे जेंव्हा प्रतिपादन केले तेंव्हा गॅलिलिओने त्याला गूढ कल्पनाविलास (Occult Fancy) म्हटले होते. हे लक्षात ठेवले पाहिजे. आणि त्याबद्दल गॅलिलिओला दोष देता येत नाही.


चमत्कार अशक्य म्हणणाऱ्यांचे विज्ञान  


चमत्कार अशक्य आहेत म्हणणारे चमत्काराचा अर्थ भौतिक शास्त्राने प्रस्थापित केलेल्या नियमांचा भंग  असा करतात.  आपण एखादा विशिष्ट दृष्टीकोण स्वीकारून त्यालाच चिकटून बसल्यामुळे हे सर्व वाद निर्माण होतात. वास्तविक निसर्गात चमत्कार नावाची गोष्ट  नसते, सर्व घटना नैसर्गिकच असतात (नाही तर त्या घडल्याच नसत्या) ज्या घटना आपल्याला समजत नाहीत त्यांना आपण चमत्कार हे नाव देतो इतकेच. म्हणजे नैसर्गिक घटना  समजून घेण्याच्या आपल्या असमर्थतेतून चमत्कार निर्माण होतात. जितकी आपली असमर्थता अधिक तितके चमत्कार ही अधिक. सेंट किल्डा बेटातील लोकांना त्या बेटाला एखादे जहाज येऊन पोहोचल्यानंतर प़डसे होत असे. हे ऐकून डॉ. जॉन्सनने म्हटले होते की असा चमत्कार घ़डणे अशक्य आहे. पण तसे खरोखरच घडत होते, कारण तो चमत्कार नव्हता. जंतुनिर्मित रोगांचा सिद्धांत प्रस्थापित झाल्यावर  - व्हायरसमुळे पडसे होते हे कळल्यावर त्यातील चमत्कार नष्ट झाला.
विज्ञानाबाबत संकुचित दृष्टीकोन असलेले लोक समजतात की, विज्ञानाने भौतिक विश्वासंबंधी शोधून काढलेले नियम अबाधित व स्वयंपुर्ण असून या विश्वासंबंधी विज्ञानाला सर्व ज्ञात झालेले आहे. असा दृष्टीकोन स्वीकारणाऱ्यांच्या विज्ञानाला 'यंत्रवादी विज्ञान' म्हणतात. एकोणीसाव्या शतकातील या दृष्टीकोनाचा प्रवक्ता म्हणून लाप्लास याचा उल्लेख करता येईल. त्याने य़ांत्रिक विश्व (Mecanique Celeste) हा पाच खंडांचा ग्रंथ नेपोलियन बादशहाला भेट देण्यासाठी त्याच्याकडे गेला असता नेपोलियन बादशाहाने विचारले , 'महाशय लाप्लास!, आपण आपल्या ग्रंथात ईश्वराचा एकदाही उल्लेख केलेला नाहीत असे ऐकतो. एवढ्या प्रचंड ग्रंथात हा उल्लेख आपण कसा व का टाळला? यावर लाप्लास म्हणाला, 'मला ईश्वराच्या गृहित कृत्याची गरज नाही ('Je nai pas besoin de cette hypothese') ईश्वराच्या गृहित कृत्याची गरज मानवाला विश्वातील न समजणाऱ्या गोष्टींची कारणमिमांसा  देण्यासाठी असल्याने लाप्लासला सुचवायचे होते की विश्वात मानवाला न समजण्यासारखे (चमत्कार वगैरे ) काही नाही. पण या शंभर वर्षात इतके परिवर्तन घडून आले की सर जेम्स जीन्स या प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञाना असे म्हणाले लागले की आज बहुतेक सर्व भौतिक शास्त्रज्ञात विश्व हे यंत्र नाही याबद्दल एकमत झाले आहे. असे म्हणावयास हरकत नाही...


...स्थूल जगत समजण्यासाठी सूक्ष्म जगताचा अभ्यास नसून  सूक्ष्म जग समजण्यासाठी स्थूल जगताचा  हा अभ्यास आहे, अशी शाब्दिक मखलाशी य़ेथे कोणी करीलतरी त्याने प्रश्न डावलता येत नाही. स्थूलजगताततील नियमांनी तिची उपपत्ती लावण्याची जबाबदारी शास्त्रज्ञ टाळू शकत नाहीत. त्यासाठी स्थूल व सूक्ष्म असा फरक करायचा असेल तर असा फरक करून उपपत्ती तरी लावता आली पाहिजे. अन्यथा असा फरक करण्याची काहीच गरज नाही (मग ही उणीव सूक्ष्म जगताच्या अभ्यासाची उणीव न ठरता सर्वच विज्ञानाची उणीव ठरते) आणि प्रत्यक्षात काही शास्त्रज्ञ ही उणीव आहे हे मान्य करतात. दुसऱ्या शब्दात,  ज्याला सामान्य लोक चमत्कार म्हणतात,  पण जे वास्तवात चमत्कार नाहीत ते वैज्ञानिक दृष्ट्या समजाऊन घेण्याच्या प्रयत्नाला ते लागले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून एक नवेच शास्त्र उदयाला आले आहे. त्या पुढील प्रकरणात विचार करू.
या बद्दल इथे वाचा.

Saturday 2 June 2012

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

लेखक – प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक – 9902002585
वेदान्त विवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-.
हे पुस्तक पुर्वी विविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळे असले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञान म्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतः सत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात. या अर्थाने विज्ञान शब्द आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी उपनिषदातून फार पुर्वीचा वापरला आहे. अतींद्रिय सत्य बुद्ध्यातीत असूनही भौतिक विज्ञानाने त्याचे ज्ञान बुद्धिला (तात्विक व अप्रत्यक्ष रीतीने का होईना) होते, म्हणून भौतिक जगाचा वैज्ञानिक अभ्यास (भौतिक संशोधन) हा अध्यात्मिक सत्याच्या अनुभवासाठी आवश्यक आहे असे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे या पुस्तकातून प्रतिपादन आहे. त्यांचे सर्व लेख अशा संगतवारीने आहेत की ते पुस्तकाच्या शीर्षकाला न्याय देतात.
या सुसंगत संकलनात लेखकाचा अप्रतिहत सर्वांगिण व्यासंग व भाषेवरील प्रभूत्व, सुक्ष्म व सखोल चिंतन थक्क करणारे आहे. विशिष्ट हेतू मनांत ठेऊन लेखन करणाऱ्या पुरोगामी विचारवंतांना गीतेसारख्या ग्रंथांचे विकृतीकरण केल्याशिवाय स्ववैशिष्ठ्यवादी म्हणून सन्मान मिळत नाही. अशांचा खरपुस समाचार लेखकाने घेतला आहे.
चार्वाकवादावर लेखन करताना ते म्हणतात, चार्वाकांच्या प्रत्यक्ष प्रामाणवादचे तत्व (जेथे धूर आहे तेथे अग्नी आहे हे अनुमानाने सिद्ध होत नाही. अग्नीचे अस्तित्व केवळ प्रत्यक्षाने सिद्ध होते.) स्वीकारणे विज्ञानाला अशक्य आहे. कारण विज्ञानाचा जन्मच अनुमानातून झाला आहे. तर चार्वाक त्या अनुमानालाच ठोकरून देतात.
चार्वाकांचा देहात्मवाद (आत्मा किंवा जीव म्हणून देहाव्यतिरिक्त काही नाही ) हा आधुनिक भाषेतील यंत्रवाद होय. तो कसा भ्रामक व चुकीचा आहे ते प्रथम प्रकरणात त्यांनी अनेक उदाहरणांनी दाखवून देतात. त्यामुळे चार्वाकांचा सुखवाद (देहाचे सुख तेच खरे सुख) व्यावहारिकतेच्या कसोटीवरही टिकू शकत नाही. माणूस केवळ घृत (अन्न) आणि अंगनालिंगन (मैथुन) एवढ्याचसाठी जगतो हे खरे नाही. कारण तेवढे सुख मिळाल्यावर तो सुखी होताना दिसत नाही. बुद्धी, विवेकशक्ती, भाषा यांचे मानवी जीवनात कार्य काय? शरीरसुखासाठी त्यांची गरज आहे काय? असा प्रश्न करून निसर्गाला ही चार्वाकवाद मान्य आहे काय? असे ते विचारतात.
प्रकरण 2 मधे  प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी प्रामाण्यवादाच्या पुरस्कर्त्यांना इशारा दिला आहे. सत्य जाणण्याचे अंतिम प्रमाण भौतिक नसून आत्मिक (अनुभाविक) आहे. त्यासाठी भौतिक प्रमाणवाद टाकून अनुभवप्रमाणवादी बनणे आवश्यक आहे. नेमके तेच कथन क्वांटम सिद्धांतात परस्पर विरोध (पॅरॉडॉक्सिकल) रुपाने, तर अध्यात्मशास्त्रात सदसद्विलक्षण रुपाने सांगितला जातो असे ते म्हणतात.
प्रकरण 3 मधे जीवोत्पत्ती हे रुढ जीवशास्त्राला न सुटलेले कोडे यात ते म्हणतात, जीव हा तुकड्यांनी बनलेला नाही तर माहितीने बनला आहे. योगायोगाने नव्हे तर नियमानुसार निर्माण झाला आहे. अपघाताने नव्हे तर स्वाभाविकपणे बनला आहे असे संगणकयंत्राने गणितीय नियमांनी दाखवून दिले आहे. मात्र अडचणीची समस्या सोडवण्यासाठी काही शास्त्रज्ञ ती समस्या टाळण्याचा किंवा नसल्याचा प्रयत्न करताना दिसतात. तो कसा खोटा आहे हे लेखकाने सप्रमाण दाखवून दिले आहे.
प्रकरण 4 प्लँचेट या रंगतदार विषयाला वाहिलेले आहे. त्याचे नियम, विलक्षण अनुभव, पाश्चात्यांनी त्यावर केलेले प्रयोग सर्व माहिती नवी आहे. प्लँचेट करून मिळणारी उत्तरे कोण देतो? यावर त्यांचे मत मोलाचे आहे. ते म्हणतात की मानवी मनाच्या अतींद्रिय शक्तीचे ते रुप आहे.
प्रकरण 5 ज्योतिषशास्त्रातील ग्रह मानवावर प्रभाव पाडतात काय? यावर प्रश्नावर आधारित आहे. त्यांना तो प्रभाव हा एका व्यवस्थेचा भाग म्हणून मान्य आहे. त्यात नाडी ग्रंथांवर भाष्य करताना ते म्हणतात. फलज्योतिष हे कुंडलीवरून वर्तवलेले भविष्य असते. याच्या उलट नाडीग्रंथ भविष्य हे कुंडलीचेच भविष्य असते. म्हणजेच एखाद्या व्यक्तिचे भविष्य वर्तवण्य़ासाठी तिच्या कुंडलीची आवश्यकता नाडीग्रंथाला मुळीच नाही, कारण तिच्या कुंडलीचे भविष्यच नाडीग्रंथ वर्तवतात. त्यांनी यावरून असा निश्कर्ष काढला आहे की कुंडली किंवा ग्रह व त्या ग्रहस्थितीप्रमाणे जन्म घेणारी व्यक्ती म्हणजेच मानवी जीवन व ग्रहांची भ्रमणे ही दोन्ही एकाच व्यवस्थेने निश्चित होत असतात. म्हणजेच ती एकाच व्यवस्थेचे अंग असतात व मानवावर ग्रहा-नक्षत्रांचा परिणाम होतो काय? ही जटिल समस्या जटिल तर नाहीच पण समस्याही राहात नाही.
प्रकरण 6 संतसाहित्यातून अंधश्रद्धा निर्मूलन कसे केले आहे? यावर प्रकाश पाडणारे आहे. मात्र संतांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्यावहारिक पातळीवरील असून ते बेगडी, तोंडदेखले व निरीश्वरवादी लोकांनी ठरवलेल्या साच्याचे नाही. असे त्यांनी विविध संतवचनांची वचने देऊन ठासून सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. नी.र. वऱ्हाडपांडे निर्मित संताच्या चमत्कारवादातील भ्रामक कथनातून त्यांनी वाचकांची दुहेरी वैचारिक फसवणूक कशी केली आहे याची चिरफाड केली आहे. संतांची इच्छा असेल तेंव्हा संतांना चमत्कार करता येतात हे डॉ. वऱ्हाडपांड्यांचे कथन खोटे आहे. हे प्राचार्य अद्वयानंद गळतगे त्यांनी, संतांच्या जीवनात चमत्कार आपोआप घडतात. ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून नाहीत. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलविले ते संत म्हणून नाही तर योगी म्हणून आणि योग हे भौतिक शास्त्राप्रमाणेच एक काटेकोर शास्त्र आहे’, असे प्रतिपादन केले आहे.  
प्रकरणे 7 ते 10 मधून प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनीं काही विवेकवादी लेखकांनी भगवद्गीतेतील कथनांना समस्या ठरवून वाद उकरण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर आधारित आहेत. त्यातील प्रकरण 7 मधे ज्ञानेश्वरीतील विश्वोपत्तीच्या निरुपणावर प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी वैज्ञानिक दृष्ट्या प्रकाश टाकला आहे. तर प्रकरण 8 मधे गीतेतील नवव्या अध्यायासंदर्भात ज्ञानेश्वरांनी (काहीही) न करता भजन जाहले म्हटले आहे, त्याचा मतितार्थ कसा लावावा किंवा कसा लावू नये? याचा वस्तुपाठ आहे. ते म्हणतात, प्रत्येक कर्म परमेश्वराप्रित्यर्थच आहे हे जो जाणतो किंवा असे जाणून प्रत्येक कर्म करतो तो परमेश्वराचे भजनच करतो. कारण त्याच्या त्या जाणण्यामुळे ते कर्म परमेश्वरालाच पोहोचते. पण हे जो जाणत नाही त्या अज्ञानी मुर्खाच्या हातून हे परमेश्वराचे सहज (न करता) होणारे भजन घडत नाही.
प्रकरण 9 मधे गीतेत निष्काम कर्मयोग नाही?, गीता नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे काय?, आत्मा हा डब्यातील लाडवा प्रमाणे आहे की ढगातील वाफेप्रमाणे असावा?, गीता कथनाला युद्धभूमि  योग्य किंवा अयोग्य?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा? आदि प्रश्नांची उकल करून त्यातील वैचारिक फोलपणा उकलून दाखवला आहे. प्रकरण 10 मधे गीतेचे अधिकारी कोण? असा नेहमी विचारला जाणारा प्रश्न उत्पन्न केला आहे. त्यावर समर्पक उत्तर देताना प्राचार्य अद्वयानंद गळतगे ज्ञानेश्वरांच्या ओवीचा दृष्टांत देताना म्हणतात, तैसे अध्यात्मशास्त्री इये। एक अंतरंगचि अधिकारिये। येर वाक् चातुर्ये। होईल सुखिया।। म्हणजे एक अंतरंगी व्यक्तीच गीतेची अधिकारी आहे. बाकीचे (येर) बहिरंग गोष्टींमुळे सुखी होतात. ते कसे? तर-  वधूची आई वरात श्रीमंती पहाते, बाप वरात शिक्षण पहातो, भाऊबंद वरात जात पहातात, इतर लोक वराचे मिष्टान्न पाहून खुष होततात. असा रीतीने इतर लोक अवांतर गोष्टीं पसंत करतात. एकटी वधूच वराला वर म्हणून निवडते, पसंत करते. म्हणजेच जन्माचा सोबती म्हणून निवडते. म्हणून तिचा एकटीचाच वरावर अधिकार चालतो. इतर कुणाचाच नाही. गीतेच्या अधिकारी व्यक्तिबद्दलही तसेच आहे. कारण त्याला गीता ही जन्माची सोबती (जीवनाचार) म्हणून निवडाची असते.
प्रकरण 11 हे या पुस्तकाचा मुकुटमणी आहे. अष्टावक्र गीता अर्थात कैवल अदैत वेदांत - म्हणजे काय?’ राजा जनकाला आठ ठिकाणी वाकलेल्या योग्याने केलेला उपदेश व श्री कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश यातील तुलना,  केवल वेदांतातील दृष्टीसृष्टीवाद तो काय? मुक्त पुरुष जगात कसा वावरतो? दृष्य़ जग व देह हे खोटे कसे ? यावरील त्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले विवेचन रंजक आहे. अनेक उपनिषदांचे, संतांचे व पाश्चात्य विचारकांचे संदर्भ देण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या लेखनातून प्राचार्य अद्वयानंद गळतगे हे ज्ञानी व्यक्तिमत्व स्वानुभवविश्वाचे माणिक-मौत्तिकांचे आगर आहेत असे जाणवते.

भौत विज्ञानाकडून अतींद्रिय विज्ञानाकडे     -     प्रकरण 1

या  प्रकरणात प्रा. अद्वयानंद गळतगे म्हणतात.....
जे पाच इंद्रियांना जाणवते , त्याचाच फक्त वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे शक्य आहे, असे समजण्याचे काऱण नाही. मनोविज्ञान हे मनाचा वैज्ञानिक व पद्धतीने अभ्यास करते. पण मन हे इंद्रियविषय होऊ शकत नाही. पण म्हणून मनच अस्तितावात नाही असे म्हणता येणार  नाही. जीव विज्ञान (Biology) जीवाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करते. पण जीव इंद्रियविषय नाही. पण म्हणून जीवच अस्तित्वात नाही असे म्हणता येणार नाही. जीव व मन हे स्वतंत्रपणे अस्तित्वात नसून ते भौतिक विश्वाचेच भाग आहेत, असे मात्र भौत वैज्ञानिक म्हणू शकतात. पण ते भौतिक विश्वाचे कसे भाग होऊशकतात, हे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करणे भाग आहे. तसे सिद्ध झालेले नाही. मनाचा किंवा जीवाचा 'फॉर्म्युला' तयार करता आलेला नाही. पण म्हणून त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासच करता येत नाही , असे समजता येईल काय?....
... आपण काल भूत कालाकडून भविष्यकालाकडे जात आहे असे मानतो. पण फेनमनच्या शोधानुसार काल भविष्याकडून भूतकालाकडे जात आहे (या शोधाबद्दल 1965 साली फेनमनला नोबेल पारितोषक मिळाले आहे.) ज्याला 'फेनमनची आकृती' (Feynman's Diagram)म्हणतात. त्या आकृतीत जो कण भूतकालातून भविष्यकालाकडे जात आहे तो कण आकृती फिरवली की भविष्याकडून भूतकालाकडे जात असल्याचे दिसतो. काळाच्या या कल्पनेनुसार मी जसा भूतकालाचे 'अपत्य' ठरतो तसे भविष्यकालाचे 'भूत' ही ठरतो. म्हणजे माझे अस्तित्व भूतकालाप्रमाणेच भविष्यकालावरही अवलंबून आहं. दुसऱ्या शब्दात मी भूतकालाप्रमाणेच भविष्यकालाशीही जखडला गेलो आहे. कशाने? हे भौतिक शास्त्र सांगू शकत नाही. अध्यात्मशास्त्र मात्र  'कर्मा ने'  हे उत्तर देते. आणि या जखडण्यालाच 'पुनर्जन्म' हे नाव देते. यातून सुटका करून घेणे म्हणजे स्थलकालातीत होणे होय...
इथे आपण आणखी काय वाचाल?
  • मन स्थळ काळाची मर्यादा ओलांडू शकते...
  • मन भौतिक विश्वाची मर्यादा ओलांडू शकते...
  • क्वांटम भौत वाद...
  • गूढवादी भौतिक शास्त्र
  • एकात्म विश्व ...
  • या पुढील संशोधन....